Sunday, November 26, 2023

ग्रामसभेद्वारे होणार मतदार यादीची दुरुस्ती



अमरावती : जिल्हा प्रशासनाद्वारा ९ डिसेंबरपर्यंत दर शनिवारी व रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. याचदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन होईल व याद्वारे आवश्यक दुरुस्ती करून अचूक मतदार यादी करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी सांगितले. यावेळी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय उपस्थित होत्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादीत १८ वर्षांवरील नागरिकांचा समावेश असला पाहिजे. यामध्ये कुणीही वंचित राहायला नको. याशिवाय स्थलांतरित व अन्यत्र रहिवासी नागरिकांची नावे वगळणे महत्त्वाचे आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटीदरम्यान त्यांना मतदार, मृत, स्थलांतरित नागरिकांची माहिती देऊन सहकार्य करावे. एकदा उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदार यादीमध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे कटियार म्हणाले.शाळा, महाविद्यालयांत कॅम्प सुरू असून, १८ वर्षांचे झालेले व होत असलेल्या मतदारांच्या नावनोंदणीचा व्यापक कार्यक्रम सुरू आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, रणजित भोसले, अनिल भटकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख उपस्थित होते.


  मतदार यादीचे शुद्धीकरण, आठ हजार मतदार कमी

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये २५,००,५८० मतदार होते व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २३,९२,५३५ मतदार संख्या आहे. या १० महिन्यांत तब्बल ८०४५ मतदार कमी झाले. बीएल- ओंद्वारा घरोघरी भेटी देण्यात आल्या व याद्वारा मृत, स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. यातून मतदार संख्या कमी झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.



Labels: , ,