Sunday, November 26, 2023

अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान



 अमरावती : काँग्रेस आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करीत आहेत. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा देऊन संविधानाप्रति श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. त्या भूमिकेवर ठाम राहत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या आ.अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली. २०१४ पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता माजवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल, तर देशाचे संविधान हे एकच सशक्त उत्तर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला, तर तो नेहमीच प्रगतिपथावर राहील. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशात शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया आ. ठाकूर यांनी व्यक्त केली. संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते, याचा गाढ विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान जिल्ह्यात राबवणार असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Labels: , ,