Sunday, November 26, 2023

दर्यापुरात एकाच परिसरातील चार घरे फोडली; पोलिसांपुढे आव्हान


 दर्यापूर
: स्थानिक नगर परिषदेजवळील शिक्षक कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री चार घरे फोडून चोरट्यांनी रोकड व दागिने चोरून नेले.हरिनारायण राजाराम मंडवे (रा. शिक्षक कॉलनी) हे मुलाचा अपघात झाल्याने रुग्णालयात आहेत. घरातील कपाटामधून सोन्याची नथ, तोरड्या, काही रोकड चोरीला गेली. शिक्षक सोमवंशी यांचे भाडेकरी दामोदर चांदूरकर यांचे बंद घर फोडून कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीची लक्ष्मी मूर्ती, गणपती, तोरड्या तसेच ११ हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, वरच्या मजल्यावर घरमालक व खाली आणखी भाडेकरी असतानासुद्धा आवाज झाला नाही. तिसरी चोरी नुरोद्दीन कदीरोद्दीन यांच्याकडे झाली. भाडेकरूच्या खोलीची कडी लावून चोरट्यांनी नुरोद्दीन यांच्या घरात प्रवेश केला.त्यांच्या घरातून दहा हजार रुपये लंपास झाले आहेत. याच ठिकाणी चौथे घरसुद्धा चोरट्यांनी फोडले. परंतु, घरमालकाची तक्रार प्राप्त झाली नाही. पोलिसांची गस्त असतानादेखील घरफोड्या कशा होतात, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

घरफोड्यांची पुनरावृत्ती

दोन महिन्यांपूर्वी दर्यापुरात चार ते पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता चार ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


कलीम शाह जलील शाह (३२, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) या मागील रेकॉर्डवरील आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शहरातील काही चोयांची माहिती घेण्यात येत आहे. - संतोष ताले, ठाणेदार

Labels: , ,