Wednesday, December 20, 2023

अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना अद्यापही कुलूप अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका



अमरावती : मानधन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील २३१३ अंगणवाडी सेविका व २३१३ मदतनीस, तसेच १४७ मिनी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून, पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील २५०० अंगणवाड्यांना 'टाळे' लागले आहे.

परिणामी, मुलांचा पोषण आहार, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे काढण्यात आले, तसेच आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, शासन व प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात अंगणावीडी सेविका, मिनी अंगणवाडी व सेविका, मदतनीस आदी सहभागी झाल्या आहेत. अंगणवाडी केंद्रात बालके पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे घेतात; परंतु अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता, स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते. ही सर्व कामे ठप्प झाली आहेत.


या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अंगणवाडी कर्मचऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्या, आहाराचा दर वाढून द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.

अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक अडचणींचा सामना करत आहेत. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

-महेश जाधव,जिल्हाध्यक्ष अंगणवाडी बालकवाडी कर्मचारी युनियन



Labels: , ,