Tuesday, December 19, 2023

जितकी पाऊले चालले, तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल ! पं. मिश्रा यांनी दाखवला भक्तिमार्ग ; शिव महापुराणाचा दाखला




अमरावती दि. 19 : अमरावतीच्या श्री हनुमान गढी येथे आयोजीत पं. प्रदीप मिश्रा यांच्या अंबा अंबेश्वर शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पं. मिश्रा यांनी शिव महापुराणाचे दाखले देत भक्तांना भक्तिमार्ग दाखवला. या कथेसाठी दूर-दुरून पायी चालत आलेल्या भक्तांना ते कथास्थळ पर्यंत जितकी पाऊले चालत आले आहेत त्यांना तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल असे त्यांनी सांगिले. शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करण्यासाठी तुम्ही आपल्या घरापासून शिव मंदिरापर्यंत जितकी पावले चालत जाल भगवान शिवही तुमच्या तितकेच जवळ येतील असे पं. मिश्रा यांनी सांगितले. श्री हनुमान गढी येथे आयोजीत या शिवमहापुराण कथेला उसळलेल्या लाखो भक्तांच्या गर्दीमुळे आज पर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

amravaticitynews.com


आज-काल माणुसकी हि शेअर मार्केट प्रमाणे खाली येत आहे. उंच आकाशात भरारी घेणे हा गुण निसर्गात वावरणाऱ्या पक्ष्यांचा आहे तर दुसरीकडे भरारी घेणाऱ्याला खाली खेचण्याचा गुण माणूस या जातीने विकसित केला आहे. माणूस हा माणसाचे जीवन जगणेच विसरत चालला आहे. परंतु कुठलीच जादूची छडी किंवा कोणतेच महाराज धनवर्षा करू शकत नाहीत. प्रत्येकाला आप-आपले भोग स्वतःच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे दुःख तुमचे तर तुम्हालाच शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करावे लागेल. असे पं. प्रदीप मिश्रा म्हणाले. सनातन धर्म,संस्कृती,हिंदू धर्म रूढी व परंपरा हेच वैश्विक सत्य असून,भक्ती शक्ती चा अनोखा संगम हा केवळ आपल्या धर्मातच बघायला मिळते. भगवान शिव हे देवाधिदेव महादेव असून भक्तांच्या संकट निवारणासाठी शिवआराधना हा अत्यंत सहज सोपा व सरळ मार्ग असून एक लोटा जल हर समस्या का हल हा मूलमंत्र प्रत्येक धर्मप्रेमी व सनातनी भक्ताने अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून केले. दुसऱ्या दिवशीच्या या शिवमहापुराण कथेचा समारोप लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत महिला सफाई कर्मचारी, स्वच्छता दुत व खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी आमदार दिलीप सानंदा, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचे हस्ते आरती करून झाला.
राजसत्तेला ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच

राजसत्तेला वेळो-वेळी ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच होय. राजसत्तेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा-तेव्हा अनेक संत, तपस्वी आदींनी राजसत्तेला सावरण्याचे, राजसत्तेची ताकद वाढवण्याचे काम केले आहे. शास्त्रातही याचे कित्येक प्रमाण आहेत. आणि आज राजसत्तेला संतांच्या ज्ञानाची व पाठबळाची नितांत गरज असल्याचे पं. मिश्रा यांनी सांगितले.
मला तपोवनेश्वर घेऊन चला

अंबानगरी अमरावतीच्या पावन भूमीत आल्याचे सौभाग्य लाभले हे माझे भाग्य आहे. या पावन भूमीतील तपोवनेश्वर येथे महान तपस्वी संघऋषी यांची शिव आराधना भूमी आहे. मी सर्वत्र भ्रमण केले परंतु आजपर्यंत कधीच तपोवनेश्वर येथे जाण्याचा योग आला नाही. परंतु आता मला तपोवनेश्वरला घेऊन चला अशी जाहीर ईच्छा पं. प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली. यावेळी खा. नवनीत राणा यांनी श्री हनुमान गढी हि तपोवनेश्वर पासून दूर नसल्याचे सांगून त्यांची तपोवनेश्वर दर्शनाची ईच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली

शनिवारी शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची उसळलेली अलोट गर्दी बघता आयोजकांनी रात्रीच अतिरिक्त पेंडॉल, आसन व्यवस्था उभी केली. परंतु रविवारीही उसळलेल्या लाखोंच्या गर्दीपुठे आयोजकांची अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली. या संपूर्ण परिसरात जिथवर नजर जाईल तिथवर सगळीकडे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, बाल-गोपाल,आबाल-वृध्द शिवभक्तच नजरेस पडत होते.
प्रशासनाने व्यवस्था व सुविधा वाढवावी, नागरिकांनीही द्यावी वाहन सेवा
पं. प्रदीप मिश्रा यांनी कथेला उसळनारी गर्दी, शहरापासून दूर असलेले आयोजन स्थळ बघता भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाला येथील सुविधा व सुविधा वाढवण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे कथेला येणाऱ्यांनी व विशेषतः युवकांनीही रस्त्याने पायी येणाऱ्या भाविकांना आप-आपल्या वाहनावर बसवून कथास्थळापर्यंत आणण्याची सेवा देण्याचे जाहीर आवाहन केले.

Labels: , ,