Tuesday, December 19, 2023

दोन बिबटयाच्या झुंझीत एकाचा मृत्यू !विद्यापीठ परिसरात सापडला मृतदेह


amravaticitynews.com


अमरावती दि. 19 : शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरातील टेकडीजवळ दोन बिबट आपसात भिडले. या झुंझीत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. विद्यापीठ-मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोल पंप समोरील टेकडी परिसरात मृत बिबट्याचा मृतदेह सापडला. घटनेच्या सूचनेवरून वन विभागाच्या पथकाने मृत नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आले. मृतक बिबट्या हा भानखेडा परिसरातील असून तो विद्यापीठ परिसरात शिरल्याने विद्यापीठ परिसरातील नर बिबट्याने त्याचेवर हल्ला केला. यातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. असा अहवाल वन विभागाने नोंदवला आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घटनेत आतापर्यंत ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या माहितीनुसार विद्यापीठ परिसरात एक बिबट्याचा मृतदेह दिसून आल्याची माहिती रविवारी सकाळी साडेदहा वाजता वनविभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट, वनखंड 07 मधील मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोलपंप समोरील टेकडी परिसरात डांबरी रस्ता पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर बिबट (नर) मृत अवस्थेत दिसुन आला. तेथून ५० फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसले. मृत बिबटची प्राथमिक पाहणी केली असता त्याचे डोक्यावर ओरखडे, जिभ दातामध्ये दबलेली तसेच पंज्यावर व चेहऱ्यावर नखाने ओरडलाच्या खुणा दिसून आल्या. पशुचन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकत्सालय) डॉ. सागर ठोसर यांनी त्या नरबिबट मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्या बिबट्याच्या डोक्याच्या आतील भागात जखम झाल्याने त्याचे मेंदूत अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांबू गार्डन परिसरात वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आला.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्रच सुरु
गेल्या काही महिन्यापासून शहरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. काही दिवसाआधीच एक बिबट ठार झाला, काल-परवा छत्री तलाव-भानखेडा मार्गावर एक रानमांजर गाडीखाली आल्याने चिरडल्या गेले तोच आता रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याचा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यातील दुसरा क्रमांकाचे वनक्षेत्र असलेल्या पोहरा-मालखेड जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना त्यांचा हक्काचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊन जीव गमवावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या या मृत्यू सत्रासाठी येथील निंद्रिस्त्र प्रशाषणच जवाबदार असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी निलेश कांचनपुरे यांनी केला आहे.
आणखी किती वन्यजीवांचे बळी घेणार ?
अमरावती शहरालगत असलेल्या वडाळी, पोहरा, मालखेड या प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आढळून येत असून हे जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून शासन दरबारी याची नोंद आहे परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी स्थानिक राजकीय लोकांनी उच्छाद मांडल्यामुळे व विकाऊ वन अधिकाऱ्यांमुळे सदर जंगल सद्यस्थितीत स्मशान बनण्याच्या मार्गांवर असल्याचे दिसून येत आहे. जिथे सामान्य नागरिकांना एक झाड तोडल्यास शिक्षा होते त्याठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हजारो हेक्टर जंगल विनापरवानगी नष्ट करण्यात येत आहे. यामुळे येथील वन्यप्राणी विस्थापित होत असून गेल्या वर्षभरात 7 बिबट्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे व अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. एकीकडे शासन हेच प्राणी वाचविण्याकरिता करोडो रुपये खर्च करीत असल्याचे भासवीत असतांना केवळ पक्षाचे आमदार, खासदार व ताटाखालचे मांजर असलेले अधिकारी आहेत म्हणून कार्यवाही करणार नाही ही भूमिका जर शासनाची असेल तर सामान्य जनतेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल व यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागेल अशी भूमिका वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी विषद केली


One died in a fight between two leopards! The body was found in the university premises
All

Labels: , , ,