Tuesday, October 31, 2023

MAHARASHTRA | देवेन्द्र फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; संजय राऊतांची मागणी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून पलायन केलं आहे. एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना, महाराष्ट्र इतका खदखदत असताना छत्तीसगडमध्ये प्रचार करत आहेत. छत्तीसगडचा प्रचार महत्त्वाचा आहे की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था? दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. आता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होत


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वत:ला खूप जबाबदार आणि कर्तबगार समजतात. राज्यांची त्यांना खडा न् खडा माहिती आहे. राज्य इतकं पेटलेलं असताना ते राज्यात नाही. त्यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. गृहमंत्री पदाची जबाबदारी असलेला नेता राज्य सोडून कसं जाऊ शकतो?, असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.


राज्य नुसतं पेटलेलं नाही तर लोकप्रतिनिधींची घरंही पेटवली जात आहेत. नेत्यांना गावबंदी केली आहे. लोकांना गावात येऊ दिलं जात नाही. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चिघळत चाललं आहे. आज ते पडले. मला दिल्लीत समजलं. आणि गृहमंत्री छत्तीसगडमध्ये भाषणं करत आहेत. राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. गावबंदी सुरूच राहील. गृहमंत्री ज्या पद्धतीने बेदरकारपणे वागत आहेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.


मंत्र्यांना गावात येऊ दिलं जात नाही. आमदारांची घरे जाळली जात आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ सुरू आहे. कुठे आहे कायद्याचं राज्य? कायद्याचं राज्य केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी आहे काय? खोटे खटले दाखल करणं हे कायद्याचं राज्य? हे काय सरकार आहे का? असा सवाल करतानाच सरकारच अस्तित्वात नाही. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हे बेकायदेशीर सरकार आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा अवाका नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणात हे राज्य सापडलं आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना फटकारलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मूळात राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं पाहिजे. ते या पदासाठीच अपात्र आहेत. ज्या पद्धतीने ते चालढकल करत आहेत, ज्या पद्धतीने ते सर्वोच्च न्यायालयाला फाट्यावर मारत आहेत, ज्या पद्धतीने ते संविधानाला मानत नाहीत, अशी व्यक्ती कोणत्याही घटनात्मक पदावर असेल तर ती अपात्रच आहे. आधी त्यांना अपात्र केलं पाहिजे. मग इतर आमदारांना अपात्र केले पाहिजे, असे ते म्हणाले.

Labels: , ,