Thursday, November 23, 2023

Amravati | अमरावती मध्ये रुजू न झालेल्या पोलिस उपायुक्तांची पुण्यात बदली



 अमरावती : वर्षभरापूर्वी अमरावती शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून बदली झालेले मात्र वर्षभरानंतरही येथे रूजू न झालेल्या संभाजी कदम यांची पुणे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. ते येथे रूजूच झाले नसताना त्यांची येथून बदली कशी, असा प्रश्न खाकीत विचारला जात आहे. कदम यांच्या सुधारित बदलीचा आदेश २० नोव्हेंबर रोजी काढण्यात आला हे विशेष.राज्याच्या गृह विभागाने गतवर्षी ८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला होता. यामध्ये १०९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश होता. यात पुणे स्थित गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक सेवा पोलिस अधीक्षक संभाजी सुदाम कदम व पुणे शहर परिमंडळ-२ चे उपायुक्त असलेले सागर नेताजी पाटील या दोन पोलिस अधिकाऱ्यांची अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदलीने पदस्थापना करण्यात आली होती. त्यातील सागर पाटील हे गतवर्षीच आदेशाप्रमाणे अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून रूजू झाले. त्यांना परिमंडळ एकची जबाबदारी देखील देण्यात आली. मात्र, संभाजी कदम पुण्याहून अमरावती शहर आयुक्तालयात रूजूच झाले नाहीत. ते रूजू होतील, म्हणून अमरावती आयुक्तालयातून बदली झालेल्या उपायुक्त विक्रम साळी यांना येथून पदमुक्त करण्यात आले नाही. संभाजी कदम यांच्या रूजू होण्यावर विक्रम साळी यांना तब्बल एक वर्ष अधिकचे काढावे लागले. मात्र, कदम हे बदली आदेशाच्या वर्षभरानंतर ही येथे रूजू झाले नाहीत. आता आश्चर्यकारकरीत्या त्यांची पोलिस उपायुक्त पुणे शहर अशी बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी ते आदेश निघालेत. विशेष म्हणजे ७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार ते अमरावती शहर पोलिस उपायुक्त असल्याचा संदर्भ देखील २० नोव्हेंबरच्या आदेशात नमूद आहे. त्यामुळे कदम हे आयुक्तालयात रुजू झाले नाहीत, हे गृहविभागाच्या लेखी नसावे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता गणेश शिंदे हे अमरावतीचे नवे पोलिस उपायुक्त असतील. मात्र, ते अद्याप रूजू झालेले नाहीत.


हनमंत गायकवाड केव्हा येणार?

१३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार, अमरावती शहर पोलिस आयुक्तालयाला तीन नवे सहायक पोलीस आयुक्त्त मिळाले. मात्र, शिवाजी बचाटे व कैलास पुंडकर हे दोघेच अधिकारी शहर आयुक्तालयात रुजू झाले. मात्र, आदेशाच्या ४० दिवसानंतर ही हनमंत गायकवाड मात्र एसीपी म्हणून रूजू झालेले नाहीत. त्यापूर्वी सुधीर पाटील नामक अधिकाऱ्यांची देखील एसीपी अमरावती म्हणून बदली झाली होती. मात्र ते देखील रुजू झाले नाहीत

Labels: , ,