Sunday, October 29, 2023

शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये - आ.सौ. सुलभाताई खोडके


 अमरावती २९ ऑक्टोबर : -  ज्या प्रमाणे अन्न ,वस्त्र व निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे मानवाच्या सर्वागीण विकास व प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणातून देशाचा , समाजाचा व  कुटुंबाचा विकास  होत असल्याने शिक्षणच हा विकासाचा खरा पाया आहे. त्यामुळे गरीब व आर्थिक दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य परिवारातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल तर   आजच्या बदलत्या युगात महापालिकांच्या शाळांनी  अद्यावत व आधुनिकतेची  कास धरणे जरुरीचे आहे. यासाठी  त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण ,व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्द करण्याचा आपला संकल्प आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये, यासाठी महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये  केजी पासुनचे तर बारावी  पर्यतचे शिक्षण  उपलब्ध  करून देण्याचा मनोदय  अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला . 
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम  यांची  जयंती  "वाचन प्रेरणा दिना "  निमित्त अमरावती महानगर पालिका शिक्षण विभाग व शोध प्रतिष्ठानच्या वतीने  महापालिकांच्या शाळांमध्ये  आयोजित निबंध स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मेहंदी कला स्पर्धेचा  बक्षीस वितरण सोहळा तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दि.२८ ऑक्टोबर २०२३ रोजी  म.न पा उर्दू माध्यमिक डिजिटल शाळा क्र.८,जमील कॉलनी येथे  मोठ्या थाटात संपन्न झाला.  यावेळी त्या बोलत होत्या . अमरावती महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त-देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते,विधिमंडळ समनवयक-संजय खोडके, मनपा शिक्षणाधिकारी-डॉ. प्रकाश मेश्राम,  सिस्टीम मॅनेजर-अमित डेंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, माजी शिक्षणाधिकारी-डॉ. अब्दुल राजिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी-हाजी रफिक सेठ, सनाउल्लाह सर,उर्दू टीचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष-गाजी जहरोश, नादिममुल्ला सर,जावेद सेठ,अब्दुल राजिक हुसेन, अफसर बेग,सनाउल्लाह ठेकेदार,  बबलूभाई, इम्रानखान,माजी नगरसेवक-इम्रान अशरफी,सय्यद मंजूर,मोहम्मद अबरार,आयटीआय निदेशक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस-भोजराज काळे,मुख्याध्यापक-अब्दुल सईद आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की , अमरावती महापालिकेच्‍या अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या,भौतिक सुविधा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांची त्यामानाने पटसंख्या कमी होती  बदलत्या शिक्षण प्रणाली नुसार मनपाच्या शाळा अद्यावत झाल्या नसल्याने पालकांचा याकडे कल दिसत नव्हता. भविष्यात या शाळा टिकल्या पाहिजे व सर्वसामान्य गरीब व गरजू घटकांना  प्रगत व नाविण्‍यपुर्ण शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आजच मनपाच्या शाळांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने   मनपाच्या शाळांची वर्तमान स्थिती व तेथे नावीन्यपूर्ण सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपण मनपा प्रशासनाची समन्वय साधला .  विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणे आवश्यक असून गरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी  यासाठी  मनपाच्या शाळांमध्ये नर्सरी , केजी-वन , केजी-टू व पहीलीचा वर्ग इंग्रजीतून सुरु   करण्यात आले आहेत.  तर अनेक नावीन्यपूर्ण सुधारणा झाल्याने आता पालकांचा आपल्या पाल्यांना प्रवेशित  करण्यासाठी मनपा शाळांकडे कल वाढला आहे.  
शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासह विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यासाठी त्यांचा क्रीडा क्षेत्रातील वाढता कल लक्षात घेता, मनपाच्या शाळांमध्ये २९ फिजिकल एज्युकेशन टीचर्स अर्थातच क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.   महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मनपाच्या आगामी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्यात आली पाहिजे,याकरिता आपली आग्रही भूमिका व कटीबद्धता राहील असा विश्वास याप्रसंगी  आमदार सौ .सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला .  
तर आपल्या अध्यक्षीय संबोधनात मनपा आयुक्त देविदास पवार यांनी विद्यार्थी गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा वाढ यासाठी  अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अत्याधिक वेगाने सुधारणा होत  असून अमरावती शहरांमधील  अनेक खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा  प्रगत झाल्याने  मनपा शाळेसमोर हाऊसफुल्ल चे बोर्ड झळकत असल्याने हि एक चांगली उपलब्धी असल्याचे सांगितले .   विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे व तेही चांगल्या दर्जाचे असले पाहिजे या भावनेतून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अनेक सोयी सुविधा पुरविण्याकडे जातीने लक्ष दिल्या जात आहे. एकंदरीत मनपाच्या सर्व शाळांना नवे स्वरूप देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे मनपा आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले .   
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी आपल्या संबोधनात मनपा शाळांच्या प्रगती व कामगिरी बाबत प्रशंसा केली . मनपाच्या  शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आजच्या घडीला दर्जेदार शिक्षणासह वाढती पटसंख्या बघता यात शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांचे निश्चितच बहुमूल्य योगदान आहे. मनपा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात तेथिल शिक्षक , मुख्याध्यापक व सर्व घटकांनी केलेल्या प्रयत्नातूनच  मनपा शाळांचे चित्र बदलले असल्याचे गौरवोद्गार संजय खोडके यांनी व्यक्त केले . 
 दरम्यान  याप्रसंगी नेहरू ट्रॉफी मध्ये उपविजेता पद मिळवणाऱ्या नागपुरी गेट स्थित मनपा शालेय विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते हॉकी स्टिकचे वितरण करण्यात आले. यासोबतच शिष्यवृत्ती परीक्षा,मेहंदी स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत अलौकिक कामगिरी करीत अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सुलभाताई खोडके यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व कलरफुल स्कुल मिशन अर्थातच बोलक्या भिंती आदींसह वैविध्यपूर्ण नवोपक्रम व नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या शिक्षकवृंदाचा सुद्धा यादरम्यान यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी सायन्स लॅबचे आमदार -सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तदनंतर पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी विविध प्रकारच्या जाती व प्रजातीच्या रोपट्यांचे आमदार महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक-सिस्टीम मॅनेजर-अमित डेंगरे  , सूत्रसंचालन-मोहम्मद तफज्जूल सर,निशात सिद्दीकी,अर्शिया फरहीन यांनी  केले. तर आभार प्रदर्शन-सीमा सहर शेख अफजल यांनी केले.  याप्रसंगी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी,पालक, शिक्षक,शिक्षिका,आमंत्रित सदस्य व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Labels: , ,