Friday, November 10, 2023

Amravati | सोने-चांदीचा वर्क लागलेली मिठाई खा आणी स्वर्गात जा ! विषबाधा, त्वचारोग, अपचन व विविध आजारांची भीती



अमरावती दि. ९ : दिवाळी पर्वावर बाजारात सोने-चांदीचा वर्क असलेल्या आकर्षक मिठाई प्रकाराचे पीक आले आहे. परंतु सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई खाल्ल्यामुळे विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे. सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई खाल्ल्याने त्वचारोग, ऍलर्जी,अपचन व विविध आजारांची लागण होण्याचीही भीती आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी व खबरदारी म्हणून कोणताही वर्क चढवलेले अन्न पदार्थ खाणे टाळा, असा सावधगिरीचा  सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विनय करमकर यांनी दिला आहे.  

आयुर्वेदिक औषधांत सोने-चांदीचे भस्म वापरल्या जाते. आयुर्वेदाने त्याचे नेमके प्रमाण, भस्म बनवण्याची विधीही ठरवून दिलेली आहे. त्याचप्रकारे सोने-चांदीचे भस्मयुक्त ओषधी कधी खाव्या-कधी खाऊ नये, त्याचे प्रमाण किती असावे याचीही कडक नियमावली पाळावी लागते. अन्यथा त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आयुर्वेदात सोने-चांदीच्या भस्माला स्थान आहे खरे, परंतु सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई व अन्य अन्न पदार्थाचे सेवन करण्यास मात्र मनाई आहे. अश्यावेळी नागरिकांनी आनंदाच्या भरात सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई खाल्ल्यामुळे अपचन होऊन विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. तसेच ऍलर्जी, पोटाचे विविध आजार व त्वचारोगांनाही यामुळे निमंत्रण मिळते. म्हणूनच दरवर्षी दिवाळीनंतर विविध आजार व त्वचारोगांनी ग्रस्त रुग्णाची संख्या वाढते. यात बालक-वृद्ध-गर्भवती महिला यांची संख्या जास्त असते. म्हणून आकर्षण व भ्रामक जाहिरातीच्या बळी न पडता सोने-चांदीचा वर्क लागलेले अन्न पदार्थ न खाल्लेलेच बरे असेही डॉ. करमकर यांनी  सांगितले. 


भस्माला दयावी लागते रेखापूर्णत्व चाचणी 

सोने किंवा चांदीचे भस्म तयार करण्यासाठीचे नियम कठीण आहेत. सदर भस्म तयार झाल्यावर त्याची रेखापूर्णत्व चाचणी करावी लागते.  जे भस्म मेटल डिटेक्टर टेस्ट पास करते अश्याच भस्माचा उपयोग खाण्यासाठी किंवा औषधीत करावा असे आयुर्वेदातही सांगितले आहे. तयार भस्माची राख बोटावर घ्यायची, त्यावर दुसरे बोट फिरवायचे दरम्यान ते भस्म बोटांच्या रेषांत दडून जाते. असे भस्मच आयुर्वेदिक औषधीत वापरल्या जाते. बोटावर घेतलेले भस्म जर बोटाना जरजरीत लागत असेल तर ते वापर मानवी शरीरास उपयोगी न पडता त्याचा फायदा होण्याऐवजी अपायच जास्त होतो. त्या भस्माचे प्रमाणही अत्यल्प ठेवावे लागते. उदा. १ मिलिग्रॅम सोने किंवा चांदीच्या भस्माच्या १० ते १५ किलो गोळ्या तयार कराव्या लागतात. त्यातही ते सोने-चांदी शुद्ध असणे बंधनकारक आहे.


...तर काजू कतली करेल हालत पतली 

सोने-चांदीचा वर्क असलेल्या मिठाई केवळ दिसण्यासाठी आकर्षक व आरोग्यासाठी बाधक ठरतात.सोन्याचा वर्क चढवून बनलेली खव्याची मिठाई, चांदीचा वर्क लावून तयार होणारी काजू कतली तयार करण्यासाठी जे सोने-चांदी वापरात आणल्या जाते ते १०० टक्के शुद्ध (२४ कॅरेट) असणे अत्यावश्यक आहे. कारण कोणताही वर्क लावलेलील्या मिठाईचे एक-दोन तुकडेच आपले शरीर पचवू शकते. सदर प्रमाण बिघडले तर आरोग्य बिघडण्याचीच शक्यता अधिक राहते. परिणामी सोन्याचा वर्क चढवून बनलेली खव्याची मिठाई, चांदीचा वर्क लावून तयार केलेली काजू कतली खाणार्यांची हालतच पतली करते. मिठाई व अन्न पदार्थातील भेसळ ओळखता येऊ नये यासाठीही त्यावर वर्क चढवल्या जातो. चांदीचा वर्क महाग पडत असल्याने चांदीऐवजी एल्युमिनियमचा वर्क वापरल्या जाते हे अनेकदा सप्रमाण उघड झाले आहे. अश्यावेळी सोन्याचा वर्क चढवलेली मिठाई तयार करतांना जास्त कमाईच्या लालसेपोटी अन्य पिवळ्या चकाकणाऱ्या धातूचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


वय व वातावरण बघूनच भस्म सेवनाचा सल्ला 

आयुर्वेदीक डॉक्टर रुग्णांना सोने-चांदी भस्मयुक्त औषधी देतांना त्यांचे वय, वातावरण आदी बाबींचा विचार करूनच सोने-चांदी भस्मयुक्त औषधी देतात. तरुण व शरीररष्ठी चांगली असलेल्या रुग्णांना ६० ते १२५ मिलिग्रॅम प्रमाणात भस्मयुक्त औषधी दिल्या जातात. हिवाळा असेल-रुग्णाची पाचन क्षमता  चांगली असेल तर १२५ मिलिग्रॅम प्रमाणात आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर मात्र ६० मिलिग्रॅम प्रमाणात सदर भस्मयुक्त औषधी दिल्या जातात. . 

मला त्यातले काहीच कळत नाही - जिल्हा शल्य चिकित्सक 

सोने-चांदीचा वर्क चढवलेले अन्न पदार्थ-मिठाई खाल्ल्याने त्याचा काय फायदा होतो किंवा त्याचे दुष्परीणाम काय आहेत. ही विचारणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांना करण्यात आली असता, मला त्यातले काहीच कळत नाही असे अबोध उत्तर डॉ. प्रमोद निरवणे यांचेकडून मिळाले. मानवी शरीर काय पचवते-काय नाही, काय खाल्ले तर उपाय होतो, काय खाल्ले तर अपाय याचेही समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाही. उलट तुम्ही अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारा असा सल्लाही यावेळी त्यांचेकडून मिळाला. 

शासनाची परवानगी म्हणून विक्रीची अनुमती - अन्न प्रशासन 

शासनाने सोने-चांदीचा वर्क चढवलेल्या मिठाई व अन्य अन्न पदार्थांच्या विक्रीस मनाई घातलेली नाही. त्यामुळे अन्न प्रशासन विभागातर्फे सोने-चांदीचा वर्क चढवलेल्या मिठाई व अन्य अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर निर्बंध घातल्या जात नाही. अशी माहिती अन्न व औषधी प्रशासन कार्यालयातील अन्न प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Labels: , ,